Rashtsant Tukdoji maharaj.
तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांत काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. ख्नंजिरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
तुकडोजी महाराज आधुनिक काळातील महान संत होऊन गेले. अडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करीत होते. एवढंच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.
भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी त्यांची श्रद्धा व विचारसरणी होती. त्यांनी समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी अहर्निश काळजी वाहिली, चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपुर कल्पना होती. त्यामुळं त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरुपाचा विचार केला व त्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उपकारक ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्याविनंतरच्या काळातही) तीव्रतेनं जाणवतं. यातून राष्ट्रसंतांच द्रष्टेपण व्यक्त झालं आहे.
अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे त्यांच्या आयुष्यातील जसं लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणं ग्रामगीतेचं लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांची वाङमयीन पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिलं, ही त्यांची श्रद्धा होती. त्यांचं मूळनाव माणिक होतं पण त्यांचं हे नाव त्यांच्या गुरूंनी अडकोजी महाराज यांनीच योजिलं होतं.
खेडेगाव स्वयंपूर्ण कसं होईल, याविषयीची त्यांनी उपाययोजना सुचविली, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावं, सुसंस्कृत व्हावं, ग्रामोद्योग संपन्न व्हावं, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावं, प्रचारकांच्या रूपानं गावाला नेतृत्व मिळावं, अशीही त्यांची निष्ठा होती. तिचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटलं आहे. देवभोळेपणा, अंधश्रद्धा जुनाट कालबाह्य रूपी नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
सर्वधर्मसमभाव हेही राष्ट्रसंतांच्या विचारविश्वाचं एक वैशिष्ट्यच होतं. त्यासाठी त्या सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
एकेश्वरवाद ही त्यांनी विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतूनच पुरस्कारला होता. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला. आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार पुरस्कार करून आध्यात्मिक , सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी योग्य अशी पार्श्वभूमी निर्माण व्हावी, यासाठी त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधूसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचं हे कार्य अखंडव्रतासारखं चालवीत आहेत.
महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या किर्तनांद्वारे समाजाला पटवून दिलं. त्यामुळं स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणं कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिलं.
देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचं व राष्ट्राचं संरक्षण करु शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचं उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केलं. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध राष्ट्रसंतांनी आपल्या लेखनातून केला.
ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय राष्ट्रसंतांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणंच हिंदी भाषेतही विपुल लेखन केलं. आजही त्यांचं हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरुन त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्यं कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिलं होतं.
.........
courtesy wikipedia
Subscribe to:
Posts (Atom)